23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये गावितांचा मार्ग कठीण?

नंदुरबारमध्ये गावितांचा मार्ग कठीण?

सर्वाधिक मतदान कोणाच्या पथ्यावर? पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांत तर्क-वितर्कांना उधाण

नंदुरबार : प्रतिनिधी
सुरुवातीला अगदी सोपे वाटणारे नंदुरबार मतदार संघाचे गणित मात्र दिवसागणिक कठीण होत गेले. एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदारांनी डोईजड केली. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना ही निवडणूक म्हणावी तशी सोपी नव्हे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही. वडील माजी मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी राजकारणी मात्र मुलगा अ‍ॅड. गोवाल पाडवी राजकारणात सक्रिय नाही, तरी थेट खासदारकीसाठी उमेदवारी मिळाली.

सत्ताधारी आणि वडिलोपार्जित राजकारणाचा वारसा व स्वत: दोन वेळा खासदार असणा-या डॉ. हीना गावित व भाजपला मात्र रात्रीचा दिवस करावा लागला. तर एक दशकानंतर काँग्रेस पक्षाला आपला बालेकिल्ला ताब्यात येतो आहे, ही आशा पल्लवित झाली आहे. मतदारांनी भरघोस मतदान केले आहे, ते कोणाच्या पथ्यावर पडते हे ४ जूनला समजेलच, तोपर्यंत तर्क-वितर्क यांना उधाण येत राहील.

लोकसभेची निवडणूक लागली. मतदारसंघात भाजपकडून डॉ. हीना गावित तर काँग्रेस पक्षाकडून अ‍ॅड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली. अ‍ॅड. गोवाल पाडवी कोण येथून सुरुवात झाली मात्र मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे मतदारांचा वाढता कल अ‍ॅड. गोवाल पाडवी यांच्या पथ्यावर पडला. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांच्या परिवारावर नाराज एका गटाने अ‍ॅड. गोवाल पाडवी यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळली.

त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक खूप चुरशीची झाली व त्यामुळे विक्रमी मतदान झाले. लोकसभा नंदुरबार मतदारसंघासाठी झालेल्या मतदानात विधानसभा नवापूर मतदारसंघात २ लाख ३२ हजार ५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ८०.१८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या विधानसभा नवापूर मतदारसंघामध्ये कोणाच्या पथ्यावर पडणार, हे निकालानंतर समजणार आहे.

तिस-या टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात उन्हामुळे राज्यात ठिकठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला असताना १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान करणा-या नवापूरकरांनी मात्र उन्हाच्या झळा आणि वाढत्या तापमानाला न जुमानता विक्रमी ८०.१८ टक्के मतदान करून आपले वेगळेपण जपले आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे डॉ. हीना गावित व महाविकास आघाडीचे अ‍ॅड. गोवाल पाडवी या उमेदवारांत अत्यंत चुरशीच्या लढतीत कोणता उमेदवार मतदारांच्या पसंतीला उतरलाय हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

कार्यकर्त्यांकडून विजयाचे आराखडे
दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. तर सामान्य मतदारांकडून मात्र, आपापल्या परिने अंदाज बांधण्यात येत आहेत. नवापूर मतदारसंघात प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावात किती मतदान होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कोणत्या गावात कोणाचे प्राबल्य आहे व तेथे किती मतदान झाले, यावर विजयाचे आराखडे बांधले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR