कुशीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमधील राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे (आरएसएसपी) उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
यावेळी हवाई गोळीबार करून कार्यालयाचे दरवाजे व काचाही फोडण्यात आल्या. कार आणि बाईकवरून आलेल्या सुमारे १५ लोकांनी हा हल्ला केला, असून, यावेळी त्यांनी मोदी-योगींच्या घोषणा देत गोळीबार केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत
राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे प्रमुख स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हल्लेखोरांनी कसाया येथील मौर्य यांच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयाचे प्रभारी गुलाबचंद मौर्य यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी माझ्या कारचीही तोडफोड केली.हल्लेखोरांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान, आम्ही कार्यालयात धावल्यावर त्यांनी मोदी आणि योगींच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली आणि मला शिवीगाळ करत उद्यापासून कार्यालय उघडले तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणामुळे कुशीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी भाजपवर आणि योगी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस करत आहेत तपास
यानंतर कार्यालयप्रमुख गुलाबचंद मौर्य यांच्यासह स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठून ठाण मांडले आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस ठाण्याचे प्रमुख ग्रिजेश उपाध्याय यांनी मौर्य यांची तक्रार दाखल करून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची ओळख पटवून आरोपींचा शोध घेत आहेत.