मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई सेशन कोर्टाने अभिनेत्री लैला खान आणि कुटुंबाची हत्या निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिचा सावत्र बाप परवेझ टाक याला मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर फेब्रुवारी २०११ मध्ये निर्घृण हत्या झाली होती. हत्येनंतर तब्बल १३ वर्षांनी मुंबई सेशन कोर्टाने लैलाच्या सावत्र वडिलांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.दरम्यान,परवेझ टाक याला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
बॉलिवूड अभिनेत्री लैला खान हिचा सावत्र बाप परवेझ टाक याला लैला खान, तिची आई आणि चार भाऊ-बहिणी अशी मिळून सहा जणांची हत्या केल्याप्रकरणी मुंबई सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वा म्हणजेच फेब्रुवारी २०११ मध्ये इगतपूरी येथील फार्म हाऊसवर नराधम परवेझ टाक याने लैला खानसह तिच्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या केली होती. इतकंच नाही तर नराधमाने सगळ्याचे मृतदेह त्यांच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यानंतर पोलिसांनी परवेझला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला होता.
दरम्यान, लैलासह तिच्या कुटुंबीयातील सर्व जण अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईच्या ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. परवेझ आणि त्याच्या साथीदारांनी लैला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अपहरण केल्याचे नादिर पटेल यांनी तक्रारीत म्हटले होती. पोलिसांनी तपासचक्र फिरवत परवेझला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर इगतपूरी येथील फार्म हाऊसमधून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले होते.