नवी दिल्ली/ पुणे : यंदा पावसाळा चांगला असल्याची माहिती शेती प्रश्नाचे आणि हवामानचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी दिली आहे. दरम्यान, देवळाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठ दिवस देशात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात चांगल्या पावसाची शक्यता असून यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मॉन्सून भारतीय उपखंडात दाखल झाला आहे.
यावर्षी एकूण पावसाळा चांगला राहणार आहे. जूनमध्ये अधिकची उष्णता वाटणार आहे. नियमितप्रमाणे यावर्षी देखील जूनमध्ये पावसाला उशीर होईल हे नाकाराता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच फळबागा, बहुवार्षिक बागायत पिके जूनच्या पाहिल्या पंधरवड्यात अडचणीत येऊ शकतात असेही देवळाणकर म्हणाले. तसेच संकेतस्थळावर दिवसातून ३ वेळा हवामान विवेचन केले जाते. दररोज पीडीएफ फाईल रात्री ८ नंतर डाऊनलोड करून अभ्यास करावा असेही देवळाणकर म्हणाले. भारतीय हवामान जे अंदाज वर्तवते त्यावरच लक्ष द्या असेही देवळाणकर म्हणाले.
अवकाळीचा शेतीला फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा तापत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भात अवकाळी पावसाने गेल्या अनेक दिवसापासून तळ ठोकला असताना आता हवामान विभागाकडून उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अकोल्यात दुहेरी संकट
विदर्भातील अकोल्यात अवकाळी पावसासह उष्णता असे दुहेरी संकट असून गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी
अनेक ठिकाणी वादळी वा-यासह जोराचा पाऊस पडत आहे. यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे देखील आडवी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या स्थितीत काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे या वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. वादळी वा-यासह पावसाच्या स्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.