नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्थेने आज ऐतिहासिक कामगिरी केली असून, आता प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ४ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे. देशाचा जीडीपी पहिल्यांदाच ४ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला. यामुळे भारत आता ३३३ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था झाला आहे. एशियानेट वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यासह आपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर चीन दुस-या स्थानावर असून, जपान तिस-या स्थानावर आहे तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचा हा पुरावा आहे. यापूर्वी मोदी सरकारने भारत २०२४-२५ या वर्षापर्यंत ४ ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता २०२४ हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेने हा टप्पा गाठला. सध्या ग्लोबल जीडीपीच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताने या यादीत पाचव्या क्रमांकावर झेप घेत युनायटेड किंगडमला मागे टाकले आहे. विकासाची गती पाहता पुढील तीन वर्षांत भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकून जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो; असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. येत्या काही वर्षात अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आहे. सामान्यत: एका वर्षाचा कालावधी देशाचा जीडीपी मोजण्यासाठी वापरला जातो. जीडीपी हे देशाच्या आर्थिक आरोग्याचे सर्वसमावेशक स्कोअरकार्ड आहे. ते देशाचा विकास आणि आर्थिक प्रगती ओळखते. जीडीपी वाढीचा दर हा देशाच्या आर्थिक कामगिरीचा एक महत्त्वाचा सूचक आहे. देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी एजन्सीद्वारे सामान्यत: आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून जीडीपीची गणना केली जाते. खर्च, उत्पादन किंवा उत्पन्न वापरून जीडीपीची गणना केली जाते.
अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था
अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी २५.५ ट्रिलियन डॉलर आहे तर १८ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुस-या क्रमांकावर आहे. जपानचा ४.२ ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त इतर अनेक जागतिक संस्थांनी असे दावे केले आहेत.
वाढत्या मागणीचा प्रभाव
सध्याच्या काळात भारताचा जीडीपी ३.५ ट्रिलियन डॉलर आहे, जो पुढे वाढून ७.३ ट्रिलियन डॉलर होईल. जपान व्यतिरिक्त भारत २०३० पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.