24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशात रेमल चक्रीवादळाचा कहर, ७ ठार

बांगलादेशात रेमल चक्रीवादळाचा कहर, ७ ठार

ढाका : बांगलादेशमध्ये रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. रेमल चक्रीवादळामुळे बांगलादेशातील किनारपट्टी भागात जोरदार वा-यामुळे झाडे उन्मळून पडली आहे. तसेच काही भागात विजेचे खांब पडले आहेत त्यामुळे बत्ती देखील गुल झाली आहे.

बांगलादेशच्या किनारपट्टीच्या भागात रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे १२० किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारा वाहत आहे. या चक्रीवादळामुळे शेकडो गावे जलमग्न झाली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळाचा वेग सोमवारी खूप वाढला. रविवारी रात्री भूस्खलनानंतर ८०-९० किलोमीटर प्रति तास अशा वेगाने वारे वाहू लागले. मुसळधार पाऊस पडायला लागला. आता हे वादळ उत्तर -पूर्व दिशेकडे सरकले आहे. मान्सूनच्या आधी बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेलं रेमल हे पहिलं चक्रीवादळ आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत याचा प्रभाव राहतो.

चक्रीवादळासोबत वेगाने वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बारिसल, भोला, पदुआखली, सतखिरा आणि चट्टोग्रामसह अनेक भागांवर याचा परिणाम झाला. पटुआखालीमध्ये एक व्यक्ती त्याची बहीण आणि काकूसोबत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. बारिशाल, भोला आणि चट्टोग्राममध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. मोंगलामध्ये एक मच्छिमार बोट बुडाली. या बोटीमध्ये एका लहान मुलासह दोघे जण बेपत्ता झाले आहेत.

बांगलादेशमधील शाळा बंद
रविवारी बांगलादेशातील ८,००,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ९००० स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. बांगलादेशमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशमधील चट्टोग्राम विमानतळ बंद करण्यात आले आहे. कॉक्स बाजाराकडे जाणारी सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बांग्लादेशमधील चटगाव बंदरावरील कामही सध्या थांबवण्यात आले आहे.

अनेक गावे जलमय
रेमलमुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी बांगलादेशातील किनारपट्टीच्या भागात १.५ कोटी लोकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही भागांमध्ये गेल्या १२ तासांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. चक्रीवादळ ओसरल्यावर पुन्हा वीज पुरवठा सुरळित करण्यात येईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ आता उत्तरेकडे सरकले आहे. कोइरा भागात त्याचा प्रभाव आहे. पुढच्या काही तासांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री भूस्खलनानंतर ८०-९० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत होते. सोमवारी वादळी वा-यासह पाऊस पडल्याने बांगलादेशमध्ये खूप नुकसान झाले. अनेक गावे जलमय झाली आहेत. किनारपट्टीच्या भागात ५-६ फूट उंच लाटा उसळल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR