17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयएनडीए वि. इंडिया याच्यातच वर्चस्वाची लढाई

एनडीए वि. इंडिया याच्यातच वर्चस्वाची लढाई

पाटना : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा १ जून रोजी पूर्ण होणार आहे. बिहारमध्ये नालंदा, पाटणासाहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, सासाराम, काराकाट आणि जेहानाबाद या आठ जागांवर मतदान होत असून मतदार संघांमध्ये प्रचाराचा धुरळा उडत आहे. जातीय समीकरणे व तिरंगी लढत यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार बनली आहे. ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यातच वर्चस्वाची लढाई होत आहे.

एनडीएच्या जागावाटपात ही जागा सत्तारूढ राष्ट्रीय जनता दलाला सुटली आहे. मुख्यमंत्री आणि जदयू (जनता दल युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी लागोपाठ दोनदा विजय मिळवलेल्या कौशलेंद्र कुमार यांना तिस-यांदा येथून मैदानात उतरविले आहे. ते विजयी हॅट्ट्रिकची अपेक्षा बाळगून आहेत. प्रमोदकुमार निराला बहूजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढत असून, त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून डॉ. संदीप सौरभ लढत देत आहेत. जागावाटपात हा मतदार संघ माकपला (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) सुटला आहे. एकूण २९ उमेदवार येथून भाग्य आजमावत आहेत. मुख्य लढत कौशलेंद्र कुमार आणि डॉ. सौरभ यांच्यात आहे. माकपला मानणारा मोठा मतदारवर्ग येथे असल्यामुळे जदयूसाठी हा मुकाबला म्हणावा तितका सोपा राहणार नाही.

पाटलीपुत्र मतदार संघात विरोधी इंडिया आघाडीच्या जागावाटपात हा मतदार संघ लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला (राजद) सुटला आहे. येथून लालूप्रसाद यांनी आपली कन्या मिसा भारती यांना मैदानात उतरविले आहे. त्यांना भाजपचे तुल्यबळ उमेदवार रामकृपाल यादव यांच्याशी दोन हात करायचे आहेत. विशेष म्हणजे २०१४ पर्यंत रामकृपाल हे लालूप्रसाद यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांचे तिकीट कापून लालूप्रसाद यांनी मिसा भारती यांना मैदानात उतरविले. त्यामुळे रामकृपाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लागोपाठ दोनदा येथून विजय मिळवला. यावेळी ते हॅट्ट्रिकची अपेक्षा बाळगून आहेत. लालूप्रसाद यांना मानणारा मोठा वर्ग येथे असून, यावेळी बिहारमधील राजकीय हवेची दिशा बदलल्यामुळे रामकृपाल यांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
बिहारच्या प्रसिध्द पाटणासाहिब मतदार संघात भाजपने पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांच्यावर डाव खेळला आहे. २००८ मध्ये पुनर्रचनेनंतर पाटणासाहिब आणि पाटलीपुत्र या दोन मतदार संघांची निर्मिती करण्यात आली होती. त्यापूर्वी पाटणा हा एकमेव मतदार संघ होता. २००९ व २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर शत्रुघ्न सिन्हा यांनी येथून लागोपाठ विजय मिळवला होता. गेल्या वेळी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले व उमेदवारी पक्की केली. मात्र, रवीशंकर प्रसाद यांच्याकडून त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचे चिरंजीव अन्शुल अविजित यांना पाटलीपूत्र मतदार संघातून काँग्रेसने मैदानात उतरविले आहे. मीरा कुमार या स्वत: पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी यावेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने चिरंजीव अविजित यांची वर्णी काँग्रेसने लावली असून मतदार त्यांच्यावर मतांच्या स्वरूपात किती विश्वास टाकतील हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

बक्सरमध्ये मिथिलेशकुमार तिवारी येथे भाजपच्या तिकिटावर लढत असून, त्यांना राजदच्या सुधाकर सिंह यांनी कडवे आव्हान दिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये अश्विनीकुमार चौबे येथून भाजपच्या तिकिटावर लागोपाठ दोनदा जिंकले होते. त्यांचा पत्ता कट करून तिवारी यांना भाजपने संधी दिली आहे. बसपचा येथे प्रभाव नसल्यामुळे भाजप विरुद्ध राजद अशी थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चौबे हे तिकीट नाकारल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे तिवारी यांना त्यांचे सहकार्य कितपत मिळणार आहे.

सासाराम मतदार संघाकडे बिहारबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष या प्रतिष्ठेच्या मतदार संघाकडे लागलेले असते. गेल्या निवडणुकीत भाजपचे छेदी पासवान यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना धूळ चारली होती. त्यामुळे ते जायंट किलर ठरले. तथापि, यावेळी त्यांचा पत्ता कट करून भाजपने सिवेश राम हा सर्वस्वी नवा चेहरा दिला आहे. त्यांना काँग्रेसचे मनोजकुमार यांच्या आव्हानाचा सामना करायचा आहे. कुमार हे इंडिया आघाडीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना राजद आणि अन्य पक्षांची रसद मिळणार आहे. मजबूत संघटन ही भाजपसाठी येथे जमेची बाजू ठरली आहे.

काराकाटमध्ये भोजपुरी गायक पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने एनडीएसाठी येथील विजयाचे समीकरण बिघडले आहे. एनडीएने उपेंद्र कुशवाह यांना मैदानात उतरवले असून, त्यांना इंडिया आघाडीतील माकपचे उमेदवार राजाराम सिंह यांनी आव्हान दिले आहे. पवन सिंह यांना भाजपने पश्चिम बंगालमधील असनसोल मतदार संघातून तिकीट दिले होते. त्यास त्यांनी नकार देऊन अचानकपणे काराकाटमधून अपक्ष या नात्याने अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी कुशवाह समुदायाची मते येथे निर्णायक मानली जातात. माकपचे उमेदवार राजाराम सिंह हेही कुशवाह समुदायातून आले आहेत.

जदयूच्या अनिलकुमार शर्मा यांना संधी
जेहानाबादमध्ये एनडीएच्या जागावाटपात हा मतदार संघ जदयूला सुटला आहे. या पक्षाने अनिलकुमार शर्मा यांना मैदानात उतरवून ब्राह्मण कार्ड खेळले आहे. त्यांना राजदचे सुरेंद्रप्रसाद यादव यांच्याशी दोन हात करायचे आहेत. येथून एकूण पंधरा जण रिंगणात असून, त्यामध्ये बसप आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचाही समावेश आहे. गेल्या निवडणुकीत जदयूच्या तिकिटावर येथे चंदेश्वर प्रसाद येथून जिंकले होते. यावेळी त्यांचा पत्ता कापून जदयूने शर्मा यांना संधी दिली आहे.

आरा मतदार संघात मुस्लिम कार्ड
आरा मतदार संघात मोहम्मद आझम बसपच्या तिकिटावर लढत आहेत. तर भाजपने खासदार प्रदीपकुमार सिंह यांना मैदानात उतरविले असून, राजदने मोहम्मद शाहनवाज आलम यांना संधी दिली आहे. या मतदार संघात मुस्लिमांची संख्या मोठी असल्यामुळे राजद आणि बसपने येथे मुस्लिम कार्ड खेळले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR