पुणे : पुण्यातील अपघातात पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा करत अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील अपघातानंतर अख्खी पोलिस यंत्रणा आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. या पोलिसांना कोणीतरी सूचना दिल्याचा मला संशय होता आणि आता अनेक रिपोर्ट्स बघितल्यानंतर लक्षात येत आहे की अजित पवारांनीच त्यांना फोन केला असावा. कारण फक्त आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून पुण्याचे पोलिस आयुक्त आरोपीला वाचवणार नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी आयुक्तांना असा फोन केला होता का, याची चौकशी व्हावी. यासाठी त्यांचा फोन जप्त करण्यात यावा आणि मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणावरून दिवसागणिक नवनवे आरोप-प्रत्यारोप होत आहे. अपघात घडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता. त्यामुळे त्यांचा फोन जप्त करून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांच्या या आरोपाला अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलें असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना देण्यासाठी मी आयुक्तांना फोन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे अपघातावरून होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की मी लोकप्रतिनिधी आहे आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. एखादी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर ती घटना पुणे शहरातील असेल तर इथल्या पोलिस आयुक्तांना, पिंपरीचिंचवडमधील असेल तर तेथील आयुक्तांना आणि ग्रामीणची घटना असेल तर पोलिस अधीक्षकांना फोन करून सूचना देत असतो. कारण ते पोलिस यंत्रणेचे प्रमुख असतात. आम्ही शिपायाला, पीआयला किंवा एपीआयला फोन करण्याचा संबंध नाही. कारण आयुक्त त्या यंत्रणेचे प्रमुख असतात, म्हणून आम्ही त्यांनाच फोन करतो.
तुम्ही सगळेजण मला ओळखता, अशा घटना घडल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की मी कोणालाही पाठीशी घालत नाही. उलट कधी-कधी तर मी म्हणतो तिथे अजित पवार दोषी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा. त्यामुळे या घटनेतही मी आयुक्तांना सांगितले की, कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करा. कारण श्रीमंताच्या घरचा मुलगा असल्यामुळे दबाव येण्याची शक्यता होती, तसंच आर्थिक आमिष दाखवले जाण्याची शक्यता होती. अशा आमिषाला बळी न पडता कारवाई करावी, अशा सूचना मी दिल्या होत्या असा दावा अजित पवार यांनी केला आहे.