धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी (महसूल) डॉ. योगेश खरमाटे, मंडळ अधिकारी हनुमंत कुदळे, तलाठी जी. आर. शिंदे, पोलीस पाटील चंद्रकांत मगर पाटील यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व हेतुपुरस्पर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. आनंद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी केलेल्या या कारवाईचा महसूल कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी निषेध करून त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. संबंधित पोलीस अधिका-यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे, या मागणीसाठी महसूलच्या सर्वच कर्मचा-यांनी मंगळवारपासून (दि. २८ मे) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिका-यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोलीस पाटलाची तक्रार करणा-या तक्रारदाराचे बनावट शपथपत्र तयार करून, त्यावर बनावट सही केली. तक्रारदाराने दिलेली तक्रार मागे घेतल्याबाबतचा खोटा जबाब तयार केला. त्यानंतर संबंधित पोलीस पाटलास मुदतवाढ देण्यात आली. या प्रकरणी बरमगाव बु. ता. धाराशिव येथील गणेश शिवाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिवचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, अंबेजवळगा मंडळाचे मंडळ अधिकारी हनुमंत कुदळे, शिंगोली सज्जाचे तलाठी जी. आर. शिंदे, शिंगोलीचे पोलीस पाटील चंद्रकांत मगर पाटील यांच्या विरोधात भा.द.वि.सं. कलम ४२०, ४६८, ४७१, १२०(ब) अन्वये दि. २६ मे रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तीघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंडळ अधिकारी व तलाठी, पोलीस पाटील यांना जामीन मंजूर झाला आहे.
महसूल अधिकारी, कर्मचा-यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने, हेतुपुरस्पर व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची परवानगी न घेता गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. संबंधित पोलीस अधिका-यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावे, यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा विविध संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी शिष्टमंडळात धाराशिव जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल खळदकर, जिल्हा सरचिटणीस संजय माळी, विभागीय अध्यक्ष गोपाळ आकोस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष सुहास जेवळीकर, महादेव गायकवाड, सचिन पवार, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी निंबाळकर, समाधान जावळे, श्रीनिवास पवार, एन. डी. नागटिळक, राजेश पडवळ, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, कोतवाल संघटना, पोलीस पाटील संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.