किनवट : प्रतिनिधी
शहरापासून जवळच असलेल्या अंबाडी येथे मिस्त्री काम करणा-या एका तरुणाचा अंबाडी येथील इसमाने डोक्यात फावड्याने वार करून खून केल्याची घटना घडली असून यात अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. दि. २९ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
किनवट तालुक्यातील इस्लामपुरा येथील वशिम शेख महेबुब खुरेशी (वय २२) हा अंबाडी येथे उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम चालू असल्याने बांधकामासाठी गेला होता. पाणी मागितल्याच्या कारणावरून वशिम शेख व भरणे यांच्यात बाचाबाची झाली. प्रारंभी शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात उत्तम गणपत भरणे याने वशिम शेखच्या डोक्यात, पोटावर फावड्याने जोरदार वार केले. वार एवढे जोरदार होते की वशिम शेख हा जागीच ठार झाला. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या शेजारी राहणा-या विशाखा भारत मुनेश्वर (वय ५३, रा. अंबाडी) यांनाही फावड्याने मारहाण करण्यात आली. यात ती महिला गंभीर जखमी झाली.
जखमी झालेल्या विशाखास उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील आदिलाबादला पाठवल्याची माहिती आहे. घटनेचे वृत्त मयताच्या नातेवाईकांना कळताच गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात वशिम शेखच्या नातेवाईकांसह नागरिकांनी एकच गर्दी केली. तसेच वशिम शेखचे शवही ठाण्यात आणण्यात आले. जवळपास २०० ते ३०० जमावाने सरळ किनवट पोलिस स्टेशनसमोर शव आणून ठेवले होते. यामुळे काही तास किनवट शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीस पोलिस निरीक्षक सुनिल बिर्ला यांनी ताब्यात घेवून जमावास शांत करून शव वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कायदा हातात घ्याल तर कारवाई : कोकाटे
किनवट तालुक्यातील अंबाडी येथे किरकोळ कारणाहून एका मजुराला फावडे फेकून मारल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासन कायदेशीर काम करीत असतांना विनाकारण जमाव जमवून कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. यामुळे नागरिकांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.