27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रदिग्गजांच्या वारसदारांची आगामी राजकीय वाटचाल

दिग्गजांच्या वारसदारांची आगामी राजकीय वाटचाल

जळगाव : प्रतिनिधी
यंदाच्या लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक बहुरंगांनी गाजली. महाराष्ट्रात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही या निवडणुकीच्या एकूणच संचलनात दिग्गजांच्या पुढच्या पिढीने, वारसदारांनी सक्रिय सहभाग घेतला. तर काही वारसदारांनी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने स्वत:ला ‘प्रमोट’ करण्याची संधी गमावली. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीचे घमासान झाले. मात्र, निवडणुकीच्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यातील राजकारण विविध घटना, प्रसंगांनी ढवळून निघाले होते.

रोहिणी खडसेंचे एक पाऊल पुढे…
खडसेंनी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडत घरवापसीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसेंनी मात्र पवारांची साथ न सोडण्याचा पवित्रा घेतला व पित्याविरोधात भूमिका घेतल्याचे दाखवून दिले. एकीकडे लोकसभा निवडणुकीत खडसे पित्याप्रमाणे स्नुषा रक्षा खडसेंच्या पाठिशी उभे असताना तिकडे रोहिणी खडसेंनी मात्र त्यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. रोहिणी यादेखील खडसेंच्या कन्या म्हणून व कुटुंबातील दुस-या राजकीय वारसदार या रूपाने समोर येत आहेत..

धनंजय चौधरींची ‘एन्ट्री’
रावेरचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी नुकत्याच त्यांच्या वाढदिवशी झालेल्या कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले. पुढची निवडणूक ते लढणार नाहीत, त्यांचा वारसदार म्हणून पुत्र धनंजय हे गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात ब-यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. मतदारसंघातील सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी याआधीच काम सुरू केले असून शिरीषदादांच्या वाढदिवसाला धनंजय यांच्यासोबत असलेली तरुणांची फौज पाहता धनंजय यांची येणा-या विधानसभेत नक्कीच उमेदवारी मिळू शकते.

प्रताप पाटलांची तगडी यंत्रणा
जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री. परंतु, मंत्री असल्याने गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा मतदारसंघातील वेळ मर्यादित. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मतदारसंघातील एकूणच सर्व कामांची व व्यवस्थापनाची धुरा प्रताप पाटलांकडे असते. जिल्हा परिषद सदस्य यापेक्षाही पालकमंत्र्यांचे पुत्र म्हणून त्यांचा संपर्क अधिक दांडगा. या लोकसभा निवडणुकीत त्यांनीही महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचार यंत्रणेची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे जरी गुलाबरावांनी निवृत्तीचे संकेत दिले नसले तरी प्रताप पाटील तयार होतायत, असे म्हणायला जागा आहे.

डॉ. केतकी पाटलांची सुरुवात
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या माध्यमातून उभे केलेले आरोग्य सेवेचे नेटवर्क मोठे आहेच. पण हे जाळे अधिक व्यापक होण्यासाठी त्यांच्या कन्या डॉ. केतकी गेल्या काही वर्षांपासून समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी त्या उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार होत्या.

अमोल पाटील-रोहन पाटीलही चर्चेत
तिकडे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पित्याचा वारसा जनसंपर्काच्या रुपाने पुढे नेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमोल पाटलांनी एरंडोल मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची जबाबदारी एकहाती सांभाळली. तर दुसरीकडे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे पुत्र रोहन यांनीही चुलत भाऊ तथा शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार करण पवारांच्या प्रचारात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR