25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रबीडच्या निवडणुकीत पहिल्यांदाच जातीय रंग

बीडच्या निवडणुकीत पहिल्यांदाच जातीय रंग

बीड : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांत जास्त गाजले ते बीडचे राजकारण. सुरुवातीपासूनच बीडच्या निवडणुकीला जातीय रंगाने गालबोट लागले. ‘उपोषणाने कुठे आरक्षण मिळते का?’ हे पंकजा मुंडेंचे विधान. ‘कोणाचा जन्म कुठल्या जातीत व्हावा हे काही आपल्या हातात असते का?’ हा धनंजय मुंडे यांचा आक्रमक अभिनिवेषाने केलेल्या भाषणातला सवाल, तर मनोज जरांगेंची आम्ही त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेतल्याचे ऐन सांगता प्रचार सभेत सांगून ‘अपेक्षित’ संदेश सोडणारे शरद पवार यांचे वक्तव्य. त्यात भरीस भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटकात ओबीसींच्या आरक्षणात मुस्लिमांना वाटेकरी करण्यात आल्यासारखे विधान. हे सर्व डोळ्यांसमोर आणले तरी बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जातीय नूर लक्षात येतो आणि त्यातूनच लढत राज्यात अधिक चर्चेत राहिली.

उमेदवारी घोषित करण्यापासून ते अधिका-यांनाही जातीय रंग चढवून समाजमाध्यमांवरील संदेशांच्या प्रचारगंगेत ओढणा-या पहिल्याच टप्प्याने निवडणूक जातीय जाणिवांना अधिकाधिक चेतवणारी ठरणार याचा अंदाज आलेला होता. प्रचाराच्या दुस-या टप्प्यात सभा-बैठकांमधूनही जातीय प्रतीके आणि विधाने केली गेली आणि निवडणुकीने विकासाच्या मुद्यांऐवजी जातीय केंद्रित प्रचाराचा भडक रंग पकडला. त्यात मनोज जरांगे यांचे नारायणगडावर येणे, परळीतील प्रचारसांगता सभेत उदयनराजे भोसले यांचे आगमन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला आलिंगन देण्यासारखा वावर ही प्रतीके म्हणून जरी भासली तरी त्यात एक जात हा घटक स्पष्टच होतो.

बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचा आजपर्यंतचा इतिहास पाहता बहुतांश वेळा मराठेतर उमेदवार निवडून देण्याची परंपराच राहिली आहे. काँग्रेससोबत डाव्या विचारांचेही खासदार येथून निवडून गेलेले आहेत. बाबासाहेब परांजपे, क्रांतिसिंह नाना पाटील, केशरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे, गंगाधरआप्पा बुरांडे, रजनीताई पाटील, जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे हे येथील खासदार राहिलेले. यातील रजनीताई पाटील, जयसिंगराव गायकवाड हे मराठा समाजातून आलेले नेतृत्व, तर क्रांतिसिंह नाना पाटील हे डाव्या विचारसरणीतले. बबनराव ढाकणे हे जनता दलाचे उमेदवार होते.

परंतु परांजपे, क्रांतिसिंह आणि ढाकणे हे तिन्ही उमेदवार दुस-या जिल्ह्यातील होते. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत तीन दशकांपूर्वीपासून मराठा विरुद्ध मराठेतर सुप्त वादाला सुरुवात झाली. परंतु तो वाद केवळ निवडणुकीपुरताच रंगवला जायचा. आता तो थेट हाणामारी आणि संघर्षावर येऊन ठेपला आहे. निवडणुकीनंतर नांदुरघाट येथे झालेली दोन गटांतील मारहाण किंवा बीडजवळील कार्ला येथे एका ब्राह्मण कुटुंबावर झालेला हल्ला पाहता जातीय संघर्ष अधिकच चिघळणारा ठरण्याची चिन्हे दिसत असून समाजमाध्यमावरून पसरवणारे संदेश पाहता मने दुभंगून ठेवणारी निवडणूक म्हणूनही ही लोकसभा निवडणूक स्मरणात राहणारी असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR