नवी दिल्ली : आम्हाला विश्वास आहे की ४ जून रोजी देशातील जनता एका नवीन पर्यायी सरकार देईल. इंडिया आघाडी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल आणि आपण सर्व मिळून या देशाला देऊ. सर्वसमावेशक विकासात्मक सरकार आणि सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज सायंकाळी सहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार संपणार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ व्या लोकसभेची ही निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील, कारण या निवडणुकीत देशातील प्रत्येक नागरिकाने लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मतदान केले आहे. पंतप्रधान आणि भाजप नेत्यांनी धार्मिक आणि फुटीरतावादी मुद्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचे अगणित प्रयत्न केले, परंतु जनतेने मूळ मुद्दे लक्षात ठेवले, असे खर्गे म्हणाले. या निवडणुकीत देशातील प्रत्येक नागरिक जात, पंथ, धर्म, प्रदेश विसरून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आला आहे. लिंग, भाषा, धार्मिक आणि फुटीरतावादी मुद्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचे अगणित प्रयत्न भाजपने केले आणि आम्ही मुद्यांवर मत मागितल्याचे देखील खर्गे म्हणाले.
मोदींच्या वक्तव्यावरून हसू येतेय
खर्गे म्हणाले गांधी चित्रपट पाहून महात्मा गांधींबद्दल जाणून घेतल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. हे ऐकून मला हसू येते, कदाचित नरेंद्र मोदींनी गांधीजींबद्दल कधीच वाचले नसेल. ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधीजींना संपूर्ण जग ओळखते, जगात विविध ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. नरेंद्र मोदींना महात्मा गांधींबद्दल माहिती नसेल, तर त्यांना राज्यघटनाही कळणार नाही.