25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरविद्यापिठाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी रखडलेलीच

विद्यापिठाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी रखडलेलीच

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित विधी महाविद्यालयातील ‘बीएएलएलबी’ची परीक्षा २३ एप्रिलला, ‘एलएलबी’ची २३ एप्रिलला आणि ‘एलएलएम’ची परीक्षा ११ मे रोजी संपली. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या १७ ते १८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण झाल्यास निकालही वेळेत जाहीर होतील. मात्र, परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तीनवेळा विधी महाविद्यालयांना पत्र पाठवूनही पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली नाही.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठात दररोज बैठका, पाठपुरावा सुरू आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनलाइन पद्धतीने (ऑनस्क्रिन) तर पारंपारिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाइन पद्धतीने तपासले जात आहेत. बीएड, एमएड, बीबीए अशा काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाच्या नियमावलीनुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल अपेक्षित आहेत, पण यंदा शेवटच्या सत्र परीक्षेला विलंब झाल्याने निकाल २० दिवसांत लावण्याचे नियोजन आहे. मात्र, विधी शाखेच्या निकालास विलंब होईल, अशी सद्य:स्थिती आहे. या शाखेला अनुदानित मान्यता नसल्याने प्राध्यापकांची संख्याही पुरेशी नाही.

व्हिजिटर (बा ) विधिज्ञांच्या माध्यमातून काही विषयांचे अध्यापन केले जातात. पण, उत्तरपत्रिकांच्या तपासणीची जबाबदारी त्यांच्याकडे नसते. त्यामुळे मनुष्यबळाअभावी ‘लॉ’च्या उत्तरपत्रिकांची तपासणी अतिशय संथगतीने सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कॅम्पससह संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील जवळपास ६५ हजार विद्यार्थ्यांच्या अंदाजे साडेतीन लाख उत्तरपत्रिका होतात. त्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन हजार प्राध्यापक मेहनत घेत आहेत. विद्यापीठाकडूनही दररोज त्यासंबंधीचा आढावा घेतला जात आहे.

शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, असा त्यांचा प्रयत्न आहे.विद्यापीठाच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून परीक्षेनंतर २० दिवसांत निकाल लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दररोज पाठपुरावा सुरू असून अनेक अभ्यासक्रमांचे निकाल पुढील आठवड्यात जाहीर होतील. पण, निकालास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचीच असेल.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR