18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात २२ वर्षीय तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

पुण्यात २२ वर्षीय तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमधील अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन जणांना चिरडल्यामुळे देशभरात पुण्याची बदनामी होत असताना आता आणखी एका प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित तरुणीने आणि तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आलेल्या २५ ते ३० जणांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने आणि तिच्या घरच्यांनी केला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपी संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हीडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचे दिसत आहे.

नेमके काय आहे हे प्रकरण?

सूत्रांच्या मते, २००६ मधल्या एका प्रकरणात पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिका-यांनी एक जागा संपादन केली होती. त्या जागेचा मोबदला या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी या जागेवरील ताबा सोडण्यास नकार दिला होता. अशातच ज्यांनी ही जागा घेतली आहे त्या जागेच्या मालकाने बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित तरुणीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांशी वाद झाला, यानंतर त्यांनी या २२ वर्षीय तरुणीला गाडण्याचा प्रयत्न केला. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR