बंगळुरू : सेक्स स्कँडल प्रकरणातील फरार असलेला प्रमुख आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीतून बंगळुरू विमानतळावर पोहोचताच कर्नाटक पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याला थेट एसआयटी कार्यालयात नेले, एसआयटीकडून प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपी प्रज्ज्वलला न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रज्ज्वल रेवण्णाचे महिला अत्याचाराचे व्हीडीओ सार्वजनिक झाले होते. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी हसन मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीला फरार झाला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण समोर आल्यामुळे देशभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी प्रज्ज्वलच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. २७ एप्रिलला फरार झालेला आरोपी ३८ दिवसांनंतर भारतात परतला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
प्रज्ज्वलच्या आईलाही नोटीस
याशिवाय एसआयटीने प्रज्ज्वलची आई भवानी रेवण्णा यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. एसआयटीने त्यांना १ जून रोजी होलेनरसीपूर येथील घरी हजर राहण्यास सांगितले आहे. आज विशेष न्यायालयात प्रज्ज्वल आणि त्याच्या आईच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कथित अपहरण प्रकरणात त्याच्या आईने अटकपूर्व जामीन मागितला आहे. भवानी या प्रकरणात आरोपी नसली तरी, एसआयटी तिच्या भूमिकेची चौकशी करणार आहे. याच प्रकरणात प्रज्ज्वलचे वडील आमदार एच. डी. रेवण्णा यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.