नवी दिल्ली : उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या राजधानी दिल्लीमध्ये पाणी संकटाची तीव्रता वाढल्यामुळे दिल्लीकर जनतेच्या आणि आम आदमी पक्षाच्या सरकारसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘‘हरियाणाकडून दिल्लीच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधणार आहे’’, असे दिल्लीच्या पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांनी आज स्पष्ट केले.
पाणीटंचाईमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये लोकांना पाण्यासाठी टँकर सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रासले आहेत. येथील गीता कॉलनी भागातील नागरिकांनी टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पाणी न मिळणे यामध्ये सामान्य दिल्लीकर भरडले जात असून त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांनी वजिराबाद भागातील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली.
दिल्लीतील पाणी संकटाचे खापर मंत्री आतिशी यांनी हरियाणाकडून होणा-या कमी पाणीपुरवठ्यावर फोडले. त्या म्हणाल्या, की संपूर्ण दिल्ली पाणीपुरवठ्यासाठी यमुना नदीवर अवलंबून आहे. दिल्लीच्या यमुना नदीत जे पाणी येते ते फक्त हरियाणामधून सोडले जाते. दिल्लीतील वजिराबाद, चंद्रवल आणि ओखला जलशुद्धीकरण केंद्रांना यमुनेतून येणारे पाणी मिळते. हरियाणाकडून पाणी कमी येत असेल तर जलशुद्धीकरण केंद्राला पाणी कुठून मिळणार? असा सवाल मंत्री आतिशी यांनी केला.
पाच जूनपासून दिल्लीच्या प्रत्येक जलविभागात देखील उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी २०० अंमलबजावणी पथके तयार केली जातील.
दिल्लीत आता टँकरसाठी ‘वॉररूम’
दिल्लीतील पाणीटंचाईचे संकट गंभीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सरकारने गुरुवारी बैठक घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘वॉररूम’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच बांधकाम, गाड्या धुण्यासाठी पेयजलाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घातले जाणार आहेत. येथील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपने आंदोलनही केले. मंत्री आतिशी यांनी सांगितले की, दिल्ली जल बोर्डमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘वॉररूम’ स्थापन करण्यात येणार आहे. या ‘वॉररूम’चे नेतृत्व वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांकडे असेल. ज्यांना पाण्याचे टँकर हवे आहे, ते १९१६ वर कॉल करू शकतात.
….