नवी दिल्ली : देशात विजेची मागणी प्रचंड वाढ झाली आहे. अशा स्थिती औष्णिक वीज प्रकल्पात कोळशाचा किती साठा शिल्लक आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोळशाच्या सद्यस्थितीतला साठा ४५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याचे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे मंत्रालयाने कळवले आहे. देशाची १९ दिवसांची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा आहे.
मे २०२४ महिन्यात औष्णिक वीज केंद्रात दररोज सरासरी केवळ १०,००० टन कोळसा वापरात आला असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. कोळशाचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा करता यावा यासाठी वाहतूक आणि दळणवळ व्यवस्थेची सुनिश्चिती केल्यामुळे हे शक्य झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि वीज निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला उपगट नियोजनबद्धरित्या कार्यरत असून, पुरवठा साखळी कार्यक्षम राहावी यासाठीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोळशाच्या उत्पादनात ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
खाणीतील कोळशाचा साठा पुरेसा
खाणीतील कोळशाचा साठा १०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्यामुळे वीज उत्पादन क्षेत्राला पुरेसा कोळसा उपलब्ध करून देता आला आहे. कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मालगाड्यांच्या दैनंदिन उपलब्धतेत सरासरी ९ टक्के वाढ सुनिश्चित केली आहे. पारंपारिकरित्या पारादीप बंदरातूनच कोळशाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे सागरी मालवाहतूकीद्वारे कोळसा पुरवठा करण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे. कोळशाच्या वाहतूक आणि दळवळणीय धोरणानुसार योग्य समन्वय राखत धामरा आणि गंगावरण बंदरातूनही कोळशाची वाहतूक केली जात आहे.
रेल्वे मालगाड्यांची वाहतूक जलद
रेल्वे मालवाहतूक व्यवस्थेत पायाभूत सुविधांची वाढ केली गेल्यामुळे सोन नगर ते दादरी पर्यंत रेल्वे मालगाड्यांची वाहतूक जलदरित्या व्हायला मोठी मदत झाली आहे. त्यामुळे कोळसा मालवाहतूकीसाठी लागणा-या कालावधीत १०० टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा दिसून आली आहे.
४२ मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होणार
पावसाच्या हंगामात औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असायला हवा यासाठी कोळसा मंत्रालय पूर्णत: सज्ज असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. येत्या १ जुलै रोजी औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये ४२ मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होईल, असे मंत्रालयाने कळवले आहे.