मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा १ जून रोजी संपल्यानंतर आता देशाला निकालाची प्रतीक्षा आहे. ४ जून रोजी म्हणजेच उद्या मतमोजणी होणार आहे. दरम्यान, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहजपणे निवडणूक निकाल सहज पाहता येणार आहेत. पण, महाराष्ट्रात यासाठी वेगळी काही तयारी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दाखविले जाणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. या शहरांमध्ये निवडणुकीचे निकाल मोठ्या स्क्रीनवर प्रसारित केले जातील.
मुंबईची सायन मूव्हीमॅक्स साखळी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहणा-या प्रमुख ठिकाणांपैकी एक असेल. मंगळवारी देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल सर्वांना वृत्तवाहिन्यांद्वारे पाहता येणार आहे. सायन, मुंबईतील मुव्हि मॅक्स मालिकेव्यतिरिक्त, इटरनिटी मॉल ठाणे, एसएम ५ कल्याण, वंडर मॉल ठाणे आणि कांजूरमार्गसह परिसरातील विविध सिनेमांमध्ये निवडणुकीचे निकाल दाखवले जातील.
मुंबई व्यतिरिक्त, पुण्यातील लोक मुव्हीमॅक्स अमानोरा थिएटरमध्ये, नाशिकचे लोक द झोनमध्ये आणि नागपूरचे लोक मुव्हीमॅक्स इटर्निटी नगर येथे निवडणूक निकाल पाहू शकतील.
ज्या शहरांमध्ये निवडणुकीच्या निकालांचे थेट प्रक्षेपण सिनेमागृहांमध्ये दाखवले जाईल. त्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी ठेवण्यात आली आहे. मतमोजणी पाहण्यासाठी तिकिटांची किंमत ९९ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत असेल.