वाशिम : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता याच महामार्गावरील वाशिम येथील मालेगाव तालुक्यातील रिधोरा गावाशेजारील चॅनल नंबर २३९ जवळ हुंडाई क्रेटा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजता छ. संभाजीनगरवरून अमरावतीकडे निघालेल्या हुंडाई क्रेटा कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर अर्ध्यापेक्षा अधिक कार ही ट्रकच्या मागच्या बाजूने आतमध्ये घुसली. त्यामुळे कारचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक लोक जमा झाले होते. त्यांनी तातडीने जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात हलवले.