नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कारण दोन्ही संघ फक्त आयसीसी इव्हेंटमध्ये आमने-सामने येतात. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये पार्किंगच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. या सामन्यासाठी पार्किंग शुल्क १२०० डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार जवळपास एक लाख रुपये आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूने भारत-आयर्लंड सामन्यात कॉमेंट्री करताना ही माहिती दिली. हा प्रकार त्यांच्या ड्रायव्हरने सिद्धूला सांगितला.
खराब राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे २०१२ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघ फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेत भाग घेतात. क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्येही या दोघांमध्ये सामना झाला होता.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण सात सामने झाले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला एक सामना जिंकण्यात यश आले आहे.