लखनौ : देशात लोकसभा निवडणुकांत यंदा आश्चर्यकारक निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशभरात यंदाच्या निवडणुकीत भाजपने प्रचार केला. अब की बार 400 पारचा नारा देत भाजपने गेल्या 10 वर्षांतील विकासकामे, देशपातळीवरील काही महत्त्वाचे निर्णय, आणि अयोध्येतील राम मंदिर हेच निवडणूक प्रचारात प्रमुख मुद्दे बनवले होते. मात्र, उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला आहे. तर, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 33 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेश भाजपात मोठी उलथापालथ होत आहे. दिल्लीतील बैठकीपूर्वीच युपीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
उत्तर प्रदेशात झालेल्या मोठ्या पराभवानंतर भाजप नेते दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, दिल्लीतील बैठकीपूर्वीच उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चौधरी यांनी हायकमांडकडे आपला राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते. दरम्यान, भूपेंद्र चौधरी यांनी राज्यातील पराभवाच्या संदर्भाने एक अहवाल तयार केला असून तो अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे सोपवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा होणार आहे. मात्र, तत्पू्र्वीच राजीनामा सत्र सुरू झाल्याचं दिसून येत आहे.