जालना : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता.
सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी मनोज जरांगे यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध का?
मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांशी बोलत नाही आहेत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणा-या ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्हाधिका-यांनी घेतली ग्रामस्थांची दखल
ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिका-यांनी घेतल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागली असल्याने मनोज जरांगे यांना आंदोलन करता आले नाही. ८ जून रोजी उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते.