25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या जागेवरून महायुतीत पुन्हा रस्सीखेच

नाशिकच्या जागेवरून महायुतीत पुन्हा रस्सीखेच

तिकीट वाटपाचा सावळा गोंधळ सुरूच तिन्ही पक्षांत समन्वय नाही

मुंबई : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संदीप गुळवे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीत मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच तिकीट वाटपाचा गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे दोघांना एबी फॉर्म मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे उमेदवार असणार, अशी वरिष्ठ पदाधिका-यांची माहिती आहे. महायुतीमध्ये या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महेंद्र भावसार आणि किशोर दराडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. किशोर दराडे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे आणि पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी राहणार अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत नेमके चालल तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचे विसपुते दाखल करणार उमेदवारी अर्ज
अजित पवार गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु असतानाच भाजपचे पदाधिकारी असलेले धनराज विसपुते हे देखील नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या ंिरगणात उतरले आहेत. धनराज विसपुते यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर विसपुते यांनी पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली होती. धनराज विसपुते आता नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हे, विखेही भाजपकडून इच्छुक
भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी देखील नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील उमेदवार इच्छुक आहे. यावरून लोकसभा निवडणुकीसारखीच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR