24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनरेश म्हस्के अपघाताने खासदार

नरेश म्हस्के अपघाताने खासदार

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत आलेले ठाकरे गटाचे नऊपैकी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा चांगलाच समाचार घेतला.

खोक्यांच्या बळावर बेइमानी करून अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये. पण अडचण अशी आहे की, नरेश म्हस्के यांच्या अंगातील छिल्लोर आणि थिल्लरपणाचा स्वभाव आहे तो गेलेलाच नाही. आता आपण खासदार झालोय, आता आपण थिल्लरपणा करू नये, थोडं गांभीर्याने बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याला वजन असलं पाहिजे, आपण जे वक्तव्य करतो त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत, या गोष्टींचे नरेश म्हस्के यांना भानच नाही. त्यामुळे नरेश म्हस्के हे अशाप्रकारची वक्तव्यं करत असल्याचे अंधारे यांनी म्हटले.

नरेश म्हस्के म्हणतात, त्याप्रमाणे आमचे दोन खासदार त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी थेट या खासदारांची नावंच जाहीर केली पाहिजेत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असे करू नये. खासदार असलेल्या माणसाला हे शोभत नाही. कदाचित नरेश म्हस्के यांनाच आपण खासदार झालो, यावर विश्वास बसत नसेल. पैशांच्या जोरावर खासदारकी विकत घेतली त्याच्याकडून गांभीर्याने बोलण्याची अपेक्षा नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

नरेश म्हस्के यांनी कितीही हुजरेगिरी किंवा लांगुलचालन केले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना केंद्रात मंत्रिपद देणार नाहीत. त्यांच्या पक्षात अगोदरच प्रतापराव जाधव मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे नरेश म्हस्केंनी कितीही आगाऊपणा केला तरी त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR