बारामती : प्रतिनिधी
सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर शरद पवार गटाकडून पोस्टर लावण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं.. सध्या या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने राज्यात बारामतीसह १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. तर महायुतीतील अजित पवार यांच्या पक्षाला फक्त १ जागा जिंकता आली. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला १८ तर महा विकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या आहेत.
बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगलाच चिमटाही काढण्यात आला आहे. हे बॅनर कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावले आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.