मुंबई : नरेंद्र मोदी उद्या तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. अशातच एनडीएच्या मित्र पक्षांतही केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी खलबते सुरू झाली आहेत. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या गोटातून केंद्रात मंत्रिपद कोणाला द्यायचे याचा निर्णय खासदारांच्या गुणवत्तेच्या आधारावर घेणार असल्याचे म्हटले आहे.
तर शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार धैर्यशील माने आणि नरेश महस्के यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्री बनवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून केद्रीय मंत्रिमंडळात श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आहे. यासोबतच भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, उदयनराजे भोसले यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.