सोलापूर-
बाजारात आवक घटल्याने कांद्याच्या दरात तब्बल सात महिन्यांनंतर वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतिक्विंटल दोन हजारच्या आत दर मिळालेल्या कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या बाजारात नाशिक, अहमदनगर, बीड, पुणे आदी जिल्ह्यांत साठवणूक केलेल्या उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात येत आहे. हा कांदा जास्त दिवसटिकत असतो.केंद्र शासनाने निर्यातबंदी लादल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
निर्यातबंदी हटविण्याची मागणी आणि दबाव वाढल्यानंतर निर्यात शुल्क लादून निर्यातबंदी
उठवली गेली. मात्र, त्यानंतरही दरात फारशी सुधारणा झाली नाही. आतापर्यंतच्या इतिहासात एप्रिल-मे मध्ये कांद्यावर निर्यातबंदी लादली गेली नव्हती. परंतु मोदी सरकारने निर्यातबंदी लादल्यामुळे प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल होते. त्यांच्या मनामध्ये केंद्र सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली होती. या संतापाचा उद्रेक लोकसभा निवडणुकीत दिसून आला. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी भोवली. एकट्या सोलापूर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे पाचशे कोटी रुपयांची नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील कांदा पिकविणाऱ्या गावांमध्ये मोदी सरकार विरोधात संतापाची भावना होती.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली . या कांद्याला दक्षिण भारतातून मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात तरी कांद्याने महायुतीचे चांगलेच वांधे केल्याचे दिसून येते.