24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपासोबत पुन्हा कधीच हातमिळवणी नाही

भाजपासोबत पुन्हा कधीच हातमिळवणी नाही

उद्धव ठाकरेंचा सहका-यांना शब्द विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश

मुंबई : (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीतील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शिवसेनेला नकली पक्ष आणि मला नकली संतान म्हणून हिणवले. हा आपला अपमानच आहे. त्यामुळे भाजपासोबत जाणार, अशा कितीही वावड्या उठत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. भाजपसोबत पुन्हा कधीच हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्ट करताना, विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पदाधिका-यांच्या बैठकीत बोलताना दिले.

लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी, शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, नवनिर्वाचित खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी निवडणूकीतील विजयाबरोबरच ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला तेथील कारणे जाणून घेतली. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावाही उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून लढताना पक्षाला मोठा विजय मिळाला नसला तरी तो समाधानकारक आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह नसतानाही आपण ही निवडणूक लढलो. आपल्याकडे काहीच नसताना पक्षाने चांगली भरारी घेतली आहे, आपण चांगले यश मिळवले आहे. याचे समाधान मानून आतापासूनच विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा, पावसाचा विचार न करता लोकांपर्यत पोहोचा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करणार !
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना आपण भाजपाला हरवू शकतो हे दाखवून दिले आहे. यातून दिल्लीश्वरांना आपण एक चांगला संदेश दिला आहे. आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणूकीतून भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे, याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेच्या वर्धापनादिनानंतर मी स्वत: महाराष्ट्रात फिरणार आहे. या दौ-याचे वेळापत्रक लवकर जाहिर करेन, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विधानसभेला किमान १८५ जागा जिंकणार : संजय राऊत
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने भाजप व इतर मित्र मंडळींना रोखलेले आहे. नरेंद्र मोदींचे बहुमत खाली आणण्यामध्येकिंवा भाजपला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला दिल्लीतून बहुमतमुक्त केले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी आम्ही विधानसभा एकत्रितपणे ताकदीने लढू आणि राज्यातील विधानसभेच्या १८० ते १८५ जागा ंिजकू, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुन्हा एकदा राज्यात दौरा करणार आहेत. संघटनात्मक बांधणी व विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून बैठका घेतील. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बैठकांचे आयोजन करण्यात येईल. त्याची तयारी सुरु आहे. त्याच्या तारखा लवकरच जाहीर होतील अशी माहिती राऊत यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR