31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यमंत्री पदावर बोळवण करीत शिंदेंच्या शिवसेनेला औकात दाखविली

राज्यमंत्री पदावर बोळवण करीत शिंदेंच्या शिवसेनेला औकात दाखविली

मुंबई : खासदारांची संख्या कमी असतानाही अन्य पक्षांना केंद्र सरकारात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. परंतु सात खासदार असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्री पद देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी याबद्दल जाहीर खंत व्यक्त केली .

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरी यावेळी भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे घटकपक्षांना यावेळी मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. काही पक्षांची ही अपेक्षा पूर्ण झाली, पण महाराष्ट्रातील दोन्ही मित्रपक्षांना भाजपाने ठेंगा दाखवला आहे. जनता दल, लोक जनशक्ती यांचे खासदार शिंदे यांच्यापेक्षा कमी असूनही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं, तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षालाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. परंतु सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे.

एक खासदार असलेल्या अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना देखील राज्यमंत्री केले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपाने राज्यात २८ जागा लढवून त्यापैकी त्यांना केवळ ९ जागा ंिजकता आल्या. आम्ही १५ पैकी ७ जागा ंिजकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. कुठेतरी आमच्याबरोबर दुजाभाव होतोय असं दिसतंय, अशी नाराजी बारणे यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवं होतं. उदयनराजे भोसले हे तिस-यांदा खासदार झाले आहेत आणि ते वरिष्ठ देखील आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान मिळाला असता तर राज्यातील जनतेला अभिमान वाटला असता, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांचे तिखट बाण !
भाजपाकडून अपेक्षित सन्मान न मिळालेल्या शिंदे व अजित पवारांवर टीका करण्याची संधी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोडली नाही. एकावर राज्यमंत्रीपद फेकले आहे, तर दुस-याला भोपळा दिला आहे. या पक्षांना भाजपाने त्यांची औकात दाखवली आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR