मुंबई : तिसरी आघाडी जी असते, ही कायम सत्ताधा-यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. जे सत्तेत असतात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम करतात. हा आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिस-या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. परंतु महाविकास आघाडीची मते थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी नवीन आघाड्या स्थापन करायच्या. त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदाचा वापर करायचा असे धोरण मला याक्षणी दिसत आहे. सत्ताधा-यांकडून अप्रत्यक्षपणे तिसरी आघाडी बनवली जाते. आमच्यासारखे मजबूत महाविकास आघाडीची मते खाण्यासाठी तिसरी आघाडी, चौथी आघाडी ते बनवतात असा आरोप त्यांनी केला.
तसेच तिस-या आघाडीत जे कुणी समाविष्ट आहेत ते व्होट कटिंग मशिन आहेत. या राज्याच्या दृष्टीने भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र डळमळीत झाला आहे. कमकुवत झालेला आहे. मोदी येतात फिती कापून जातात. पण उद्योगाचे काय, आजही एक उद्योग गुजरातला जातायेत. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातोय तो थांबवता येतील का यासाठी मोदींनी प्रयत्न करावेत असा निशाणाही खासदार संजय राऊतांनी भाजपावर साधला.