जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज (दि. ११ जून) चौथा दिवस आहे. डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितले असून देखील ते उपचार न घेण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला याचा फटका बसेल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील सगेसोय-यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील मी उपचार घेणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठा, कुणबी एकच आहे, असा अध्यादेश राज्य शासनाने काढावा, तसेच सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही ते उपोषणावर ठाम आहेत. ८ जूनपासून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
समाजाला न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला सरकारने जाणूनबुजून परवानगी नाकारली आहे. पोलिस अधिका-यांना विनंती आहे की, ज्या लोकांनी निवेदन दिले आहे, ते लोक आमच्या लोकांना त्रास देत आहेत. शिवीगाळ करत आहेत. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था बिघडू देऊ नये. यावेळी मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन देखील जरांगे-पाटील यांनी उपोषणादरम्यान केले आहे.