24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रशक्तिपीठ महामार्गाला सत्ताधा-यांचाच विरोध

शक्तिपीठ महामार्गाला सत्ताधा-यांचाच विरोध

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणा-या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी श्रमिक महासंघाच्या वतीने १८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपेक्षा सत्ताधारी नेते शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीला शक्तिपीठ महामार्ग प्रकरणाचा जबर फटका महायुतीला बसला. त्यामुळेच हा महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, भाजप नेते समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेतकरी हिताचा नसणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला आहे.

तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील हा महामार्ग रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा गावांचा विनाश करणारा असून भांडवलदार आणि कंत्राटदार यांना मालामाल करणार आहे असे श्रमिक महासंघाचे म्हणणे आहे. केवळ संपत्तीची लूट करून हा माल परदेशात पाठवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला गेला असा आरोप देखील श्रमिक महासंघाने केला आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विरोधकांनी चांगली मोट बांधली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी शेतक-यांची चांगली मोट बांधून वातावरणनिर्मिती केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR