धाराशिव : प्रतिनिधी
भाच्यावर असलेला छेÞडछाडीचा गुन्हा मिटवून घेण्यासाठी ५० हजारांची मागणी करणा-या दोघा तोतया पोलिसांवर मामाने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात दि. १२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करत कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथील दोघांनी नळदुर्ग येथील रहीम सय्यद यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद हे नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड परिसरात राहतात. त्यांच्याकडे दि. १२ जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील आरोपी जुनेद हबीबोकद्दीन चंदा, मुनिर रियाज रंगरेज हे दोघे नळदुर्ग येथे आले. त्यांनी रहीम सय्यद यांना पोलीस असल्याचे सांगितले. तुझ्या भाच्याने मुनिर रंगरेज यांच्या भाचीची सोलापूरमध्ये रमजान महिन्यात छेडछाड केली असल्याचा गुन्हा दाखल आहे. असे खोटे बोलून गुन्हा मिटवून घेणेसाठी त्यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी केली.
पैसे नाही दिल्यास फिर्यादीचा भाच्चा नवाज सय्यद यास घेवून जाण्याची धमकी दिली. या प्रकरणी रहीम सय्यद यांनी दि. १२ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दोघा तोतया पोलिसांवर भा.द.वि.सं. कलम ३८५, १७०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.