27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeराष्ट्रीययूपीत नूतन ६ खासदारांवर कारवाईची टांगती तलवार

यूपीत नूतन ६ खासदारांवर कारवाईची टांगती तलवार

गंभीर गुन्हे, शिक्षा झाल्यास खासदारकी होऊ शकते रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशने दिलेला कौल देशभरात चर्चेचा विषय ठरला. सलग २ निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशात ६० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे केंद्रात भाजपला बहुमत मिळाले. पण यंदा उत्तर प्रदेशने भाजपला झटका दिला. यावेळी भाजपला केवळ ३३ जागा मिळाल्या. राज्यात समाजवादी पक्षाचे सर्वाधिक ३७ उमेदवार निवडून आले तर काँग्रेसचे ६ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले. पण यातील ६ खासदारांचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते.

उत्तर प्रदेशातून निवडून गेलेल्या ११ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात खटले सुरू आहेत. त्यांना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या ५, काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचेही लोकसभा सदस्यत्व जाऊ शकते. या खासदारांविरोधात मनी लॉन्ड्रिंगसह गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

समाजवादी पक्षाचे गाझीपूरचे खासदार अफझल अन्सारी, जौनपूरचे खासदार बाबूसिंह कुशवाह, सुलतानपूरचे खासदार राम भूपाल निषाद, चंदोलीचे खासदार विरेंद्र सिंह, आझमगढचे खासदार धर्मेंद्र यादव, बस्तीचे खासदार राम प्रसाद चौधरी, सहारणपूरचे काँग्रेस खासदार इमरान मसूद यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांप्रकरणी खटले सुरू आहेत.

भाजपच्या खासदारांवरही गुन्हे
फतेहपूर सिकरीचे भाजप खासदार राजकुमार चहार, हाथरसचे भाजप खासदार अनुप प्रधान, बिजनोरचे आरएलडीचे खासदार चंदन चौहान, बागपतचे खासदार राजकुमार संगवान, आझाद समाज पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधातही गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकप्रतिनिधींना २ वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झाल्यास त्याचे पद रद्द होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR