वडोदरा : क्रिकेटपटू ते लोकसभा सदस्य असा प्रवास करणा-या युसूफ पठाणच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा जागेवरून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार होण्याचा मान पटकावला. दिग्गज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पराभूत करण्यात पठाणला यश आले. पण, गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी युसूफ पठाणला नोटीस पाठविण्यात आली आहे. वडोदरा महानगरपालिकेने युसूफ पठाणला नोटीस बजावून सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे.
खरे तर युसूफ पठाणचे वडोदरा येथे आलिशान घर आहे, जे त्याने २०१४ च्या सुमारास बांधले. युसूफ पठाणवर कोणालाही माहिती न देता सरकारी भूखंडावर कब्जा केल्याचा आरोप आहे. युसूफ पठाण हा त्याचा भाऊ इरफान पठाणसोबत वडोदरा येथे राहतो. काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करून युसूफ पठाण बहरामपूर मतदारसंघातून खासदार झाला.
टीएमसी खासदार युसूफ पठाणवर भाजपचे माजी नगरसेवक विजय पवार यांनी सरकारी भूखंड हडपल्याचा आरोप केला आहे. पवार यांच्या आरोपानंतर वडोदरा महापालिकेने युसूफ पठाणला नोटीस बजावली आहे. वडोदरा महानगरपालिकेने हा भूखंड युसूफ पठाणला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विजय पवार यांचा आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता, मात्र राज्य सरकारने महामंडळाची शिफारस फेटाळून लावली. असे असतानाही युसूफ पठाणने भूखंड ताब्यात घेऊन घर बांधले. सध्या हा भूखंड युसूफ पठाणच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत हे घर जमीनदोस्त करायला हवे, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकाची आहे. युसूफ पठाणने या भूखंडावर घर बांधले त्यावेळी डॉ.ज्योती पांड्या या स्थानिक महापौर होत्या. त्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. तोपर्यंत पठाण घराण्यातील कोणीही राजकारणात नव्हते.