23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूर१ कोटी ८५ लाख ९२ हजारांचा दंड वसूल

१ कोटी ८५ लाख ९२ हजारांचा दंड वसूल

लातूर : प्रतिनिधी
शहरात वाहतूकीचे नियम मोडर्णा­यांना वाहतुक शाखेने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत चांगलाच दणका दिला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन महिन्यात १४ हजार ८८५ वाहनांवर कारवाई करुन तब्बल १ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी केले आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा दिवस-रात्र कार्यरत आहे. वाहतूक नियमनाचे काम करण्याबरोबरच वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामध्ये कागदपत्र जवळ न बाळगणे, नियमानुसार नंबर प्लेट नसणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, दुचाकीवरुन तिघांचा प्रवास, वाहनाच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृतपणे बदल करणे, सिटबेल्ट नसणे आदी बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जाते. शहरात नेमण्यात आलेल्या विविध ट्रॉफिक पॉईन्टवर शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वाहतुक नियमन कर्तव्य करत असतांना १ मार्च ते ३१ मे २०२४ दरम्यान वाहतुक  नियमांचे उल्लंघन करणा-या  एकुण १४ हजार ८८५ वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडुन रोख रक्कमसह ए. टी. एम. व क्यु. आर. कोडमार्फत  एकुण १ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपये इतकी दंडाची रक्कम वसुल केली आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अपघातही वाढत आहेत. अशात वाहतुकीचे नियम न पाळणा-या वाहन चालकांना आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवित आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस चौका-चौकात थांबण्याऐवजी अशा ठिकाणी थांबत आहेत की, वाहनचालकांना तेथून परत फिरताच येत नाही. त्यामुळे तो सरळ वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडतो. खिंडीत अडवून दंड वसुली करण्यासारखा प्रकार वाहतूक शाखेचे पोलिस करीत आहेत.
जुने गुळ मार्केट चौकातून महात्मा गांधी चौकाकडे निघालेले वाहनचालक  चंद्रनगरकडे जाणा-या रस्त्याच्या पुढे आल्यानंतर बीएसएनएल कार्यालयासमोर वाहतूक शाखेचे पोलीस उभे असतात. तेथुन वाहनचालकांना माघारी फिरता येत नाही. त्यामुळे ते वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकतात आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR