जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील कराराबद्दल चर्चा तीव्र आहे परंतु दरम्यान गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष हि तीव्र दिसत आहे. इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, आता दक्षिण गाझामध्ये हमासविरुद्धच्या कारवाया तीव्र करण्याचा त्यांचा मानस आहे. इस्रायलने यापूर्वी सामान्य लोकांना उत्तरेकडील भाग सोडून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले होते. दरम्यान, गाझामधील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायलने आपली मोहीम सुरू केल्यापासून आतापर्यंत सुमारे १३ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५५०० हून अधिक मुले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ते हे आकडे विश्वसनीय मानतात. संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, ‘सामान्य लोकांच्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे आणि ही परिस्थिती स्वीकारता येणार नाही. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. यामध्ये १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हमासच्या सैनिकांनी ओलिस घेतलेल्यांमध्ये ४० मुलांचा समावेश असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन हमासला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे.
तसेच इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दावा केला आहे की, हमासचा गाझावर १६ वर्षांपासून ताबा होता. पण, हमासने आता गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावले आहे. त्यामुळे हमासने येथून पळ काढला आहे. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत. हमासचे तळ नागरिकांनी उद्ध्वस्त केले आहेत. नागरिक हमासच्या तळांना लक्ष्य करत लूटमार करत आहेत. गाझातील नागरिकांचा सरकारवर विश्वास नाही, असे इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.