23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी

राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी

प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा

मुंबई : जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर भाजपा आणि सहकारी पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील मस्क यांनी फक्त गाड्या बनविण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नयेत असे सुनावले आहे. तसेच ईव्हीएम हॅक होत नाही, या निवडणुकीनंतर सगळ्यांची तोंडे बंद झाल्याचे आपण पाहिले आहे असे सांगत राष्ट्रवादी राज्याच विधानसभेला २८८ जागा लढविण्याची तयारी करून बसली असल्याचे म्हटले आहे.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आम्ही आणि जुनी राष्ट्रवादी आणि आमचे सहकारी असे ५७ आमदार आहेत. त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे छगन भुजबळ म्हणाले त्याप्रमाणे ८५ ते ९० जागा मागण्याचा आमचा विचार आहे, असे पटेल म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाने सुरुवातीला युती होण्यापूर्वी २८८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा २८८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युतीमध्ये बसतो तर त्यामध्ये वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात. पण युती होण्यापूर्वीच आपण २८८ जागांवर तयारी ठेवावी लागते असे प्रत्येक पक्षांचे धोरण असते, असे ते म्हणाले.

तसेच ज्यांच्याकडे बहुमत असते त्याच लोकांना सरकार स्थापनेकरिता राष्ट्रपती बोलवत असतात. त्याप्रमाणे राष्ट्रपती यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली आणि आमच्याकडे २९२ खासदारांचे समर्थन आहे. त्यामुळे निश्चितच लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएकडेच राहील. राहिला उपाध्यक्ष पदाचा प्रश्न तर २०१४ आणि २०१९ मध्ये सुद्धा उपाध्यक्ष पद हे विरोधकांना देण्यात आले नव्हते. विरोधकांना उपाध्यक्ष पद द्यावे, असा कोणताही नियम नाही. सरकार आणि विरोधकांमध्ये सामंजस्य असेल तरच असा विचार केला जाऊ शकतो. सध्यातरी अशी परिस्थिती नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना नक्कीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे पटेल म्हणाले. अजूनही सहा महिने शिल्लक आहेत आणि अनेक जागा सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिक जोमाने सरकार काम करेल, असे पटेल म्हणाले. छगन भुजबळ हे यापूर्वी सुद्धा अनेक बाबतीमध्ये अडकले होते. परंतु त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. यातून सुद्धा कोणताही आरोप सिद्ध होणार नाही. ते यातून बाहेर निघतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR