मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र २४० जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले. एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असून मित्र पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा भाजपाच्या एका नेत्याने, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा नेते टी. राजा यांनी भिवंडी येथील धर्मसभेत बोलताना, आपल्याला सरकारचे हात मजबूत करायला हवेत. एकनाथ शिंदे हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाचा हिंदू तुमच्यासोबत आहे. तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल. हिंदू एकत्र आले तर हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही सांगतो. यावेळी निवडणुकीत जर आपण ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झाले असते. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे टी. राजा यांनी म्हटले आहे. यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले.
कृष्णाचा उपदेशसुद्धा टी. राजा विसरला असावा
अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट करत टी. राजा यांच्या विधानाला उत्तर दिले. टी. राजाला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावे! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! ग्लानिर्भवती भारत हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी. राजा विसरला असावा. पुढे एक व्हीडीओ शेअर करत अमोल मिटकरी म्हणाले की, टी. राजा या एका व्यक्तीने ४०० पार गेलो असतो तर हे हिंदूराष्ट्र झाले असते, असा अजब दावा केला आहे. कदाचित टी. राजाला हे माहिती नसावे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचे नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आले आहे. ४०० पार नाही, तुम्ही ५०० पार जरी गेला असतात, तरी या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.
दरम्यान, या धर्मसभेत बोलताना टी. राजा यांनी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी केली. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंर्त्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत, असे आवाहन टी. राजा सिंह यांनी केले.