निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्यचौकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांकडून पार्किंग केली जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे . यामुळे प्रशासनाने तात्काळ पार्किंगची व्यवस्था करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकानजीकच बसस्थानक असल्याने या परिसरात दुचाकीस्वार, चार चाकी वाहने बेशिस्तपणे लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बेशीस्त पार्किंगमुळे वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास अडथळा निर्माण होत आहे शिवाय पुतळ्याच्या बाजूसच निलंगा ते लातूर अवैध वाहतूक करणा-या काळी पिवळीचा पॉईंट आहे ही वाहने भर रस्त्यावर बेशीस्तपणे लावली जात आहेत.
शिवाय दुकानासमोर दुचाकी व चारचाकी वाहने बेशीस्तपणे लावल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. एखादा दुचाकीस्वार वेगाने आल्यास अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. शहरातील हाडगा नाका, जिजाऊ चौक, आनंद मुनी चौक व निजामुद्दीन चौकात झाली आहे. यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरातील मुख्य चौकातील बेशीस्त पार्किंगवर आळा घालून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे, भटक्या विमुक्त संघटनेचे उपाध्यक्ष विलास माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ईफरोज शेख यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.