27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeराष्ट्रीयपुढील वर्षी टेस्लाची भारतात 'एंट्री'?

पुढील वर्षी टेस्लाची भारतात ‘एंट्री’?

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहने बनवणारी एलोन मस्कची कंपनी टेस्लाची पुढील वर्षी भारताच्या बाजारात ‘एंट्री’ होण्याची शक्यता आहे. टेस्लाचा भारतासोबतचा उत्पादन कारखाना करार अंतिम टप्प्यात आहे. एका रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या करारानंतर टेस्ला पुढील वर्षापासून भारतात इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी कारखाना सुरू करू शकणार आहे. एका अहवालानुसार, या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’मध्ये याची घोषणा केली जाऊ शकते.

कारखाना उभारणीसाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या नावांची चर्चा सुरू आहे. कारण या राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि निर्यातीसाठी चांगले वातावरण आहे. त्याचबरोबर अलीकडेच एलोन मस्क यांनीही पुढील वर्षी भारतभेटीचा विचार करत असल्याचे सांगितले होते. या वर्षी जूनमध्ये टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी भारतात मोठ्या गुंतवणुकीबद्दल बोलले होते. २०२४ मध्ये भारताला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. सध्या भारताच्या अवजड उद्योग मंत्रालयाने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रारंभिक गुंतवणुकीला सहमती
अहवालानुसार, टेस्ला प्लांट उभारण्यासाठी २ बिलियन डॉलर (सुमारे १६,००० कोटी) च्या प्रारंभिक गुंतवणुकीला सहमती देऊ शकते. तसेच, भारतीय कंपन्यांकडून सुमारे १५ अब्ज डॉलर्स (१.२ लाख कोटी) किमतीचे ऑटो पार्ट्स खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले जाऊ शकते. कंपनी भारतात काही बॅटरी बनवणार आहे, जेणेकरून खर्च कमी करता येईल. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. योजनांमध्ये काही बदलही होण्याची शक्यता आहे.

तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ
भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. सध्या ईव्ही मार्केटला फारशी गती मिळालेली नाही. एकूण वाहनांमध्ये ईव्हीची संख्या फक्त १.३ टक्के आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चढ्या किमती आणि चार्जिंग स्टेशनचा अभाव हे प्रमुख अडथळे ठरत आहेत. तथापि, ईव्हीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR