नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील तिढा सुटलेला असताना महायुतीमध्ये बिघाडी असल्याचे चित्र आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलीकडेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किशोर दराडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असे ठरले होते. मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी बैठकांचा जोर वाढला आहे. त्यामुळे महायुतीतच लढत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे मैदानात उतरले आहेत. महेंद्र भावसार यांचा प्रचार आणि नियोजनासाठी सुरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली. महेंद्र भावसार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, असे स्पष्टीकरण सुरज चव्हाण यांनी दिले. आम्ही दोस्तीत कुस्ती न करता मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून आमच्या उमेदवाराला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, असा गौप्यस्फोटही सुरज चव्हाण यांनी यावेळी केला आहे.