मुंबई : यंदा प्रथमच पदवी स्तरावरील बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी ही सीईटी परीक्षा पार पडलेली आहे असे असताना आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्हा एकदा सीईटी घेतली जाणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
महाविद्यालयांनादेखील याबाबत तोंडी माहिती असून परिपत्रकाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. बहुतांश सीईटी परीक्षा पार पडलेल्या असून अनेक परीक्षांचे निकालदेखील जाहीर करण्यात आले आहे. यापैकी बीबीए, बीसीए, बीबीएम या अभ्यासक्रमाची सीईटी पार पडलेली असून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे असे असताना आणखी व्यापक प्रमाणातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. यासंदर्भात कुठेच लेखी आदेश आढळून आला नाही.
तसेच व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांकडे चौकशी केली असता तोंडी स्वरूपात माहिती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत या संपूर्ण प्रकाराबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात सूचना जारी करताना स्पष्टता आणावी, अशी मागणी केली जाते आहे.
फायदा कुणाला होणार?
बारावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अशात बीबीए, बीसीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला विलंब झाल्यास विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असून अप्रत्यक्षरीत्या अशा अभ्यासक्रमांना फायदा होईल. त्यामुळे विलंब न करता दुस-यांदा सीईटी घेतली जाणार असल्यास, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.