28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार : विजय गुरव

नाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार : विजय गुरव

बुलडाणा : प्रतिनिधी
होय मी नाना पटोले यांचे पाय धुतले, यापुढेही आणखी धुणार. ते माझे दैवत असून तुम्ही राजकारण करू नका, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस कार्यकर्ता विजय गुरव याने विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. विजय गुरव हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून तो शेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. विजयने नाना पटोले यांच्या पाय धुण्यावरून विरोधकांनी पटोले यांना चांगलेच धारेवर धरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी पटोले आले होते. या दरम्यान नाना पटोले यांनी शेगावचे गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलाने पटोले यांचे पाय माखले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडीओ काल व्हायरल झाला होता. या व्हीडीओनंतर महायुतीतील नेत्याने पटोले यांच्यावर टीकेचा भडिमार केला. लोकसभेतील निकालामुळे काँग्रसचे नेते हुरळून गेले असा आरोपही काहींनी केला. त्यानंतर पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव माध्यमांसमोर आला आणि संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हणाला, नाना पटोले देवदर्शनासाठी आले असताना त्यांचे पाय चिखलाने भरले होते. मी पाणी आणून त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे? पटोले हे माझ्या वडिलांसमान असून ते माझे दैवत आहेत, मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेल, असे विजय गुरवने म्हटले.

या विषयाला घेऊन आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून नानाभाऊ पटोले यांच्यावर केले जाणारे आरोप थांबवावे. तसेच माझ्या नावाने आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेऊ नये, अशी विनंती देखील विजयने केली आहे.

भाजपचे आंदोलन सुरू
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. नागपूरच्या नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक अकोल्यातही पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR