28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रसहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेबरपर्यंत लांबणीवर

सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेबरपर्यंत लांबणीवर

मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाला चांगली सुरूवात झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पेरणी व शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतक-यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करून, सहकार विभागाने राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनास पाठविलेल्या पत्रानुसार २०२४-२५ या वर्षात राज्यातील २४ हजार ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याचे कळविले आहे. त्यापैकी ८ हजार ३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. परंतु, राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त व ५ जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतक-यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष – उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा सहकारी संस्थाना यामधून वगळण्यात आले आहे. अन्य सहकारी संस्थांची निवडणूक सध्या ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर थांबविण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे या आदेशाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR