30.1 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeसोलापूरसत्तर फूट चौकात वाहतुकीचा बोजवारा

सत्तर फूट चौकात वाहतुकीचा बोजवारा

सोलापूर : कामगारांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या कुमठा नाका, स्वागत नगर आणि ‘एमआयडीसी’कडे जाणारा महत्त्वाचा चौक म्हणून सत्तर फूट चौकाची ओळख आहे. पण या चौकात सायंकाळच्या वेळी गेलात तर आपला अर्धातास जातोच असा अनुभव दररोज तेथील नागरिकांना येत आहे. कारण या चौकात सगळ्या बाजूला मुख्य रस्त्यावर फळविक्रेत्या गाड्यांचे अतिक्रमण, शिवाय रिक्षा चालकांची प्रवाशांसाठी होणाऱ्या धावपळीमुळे चौकात नेहमी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळते.

सत्तर फूट रोडवर रस्त्यातच भाजीविक्रेते बसतात. भाजी विक्रेत्यांमुळे वाहनचालकांना अडथळा होऊ नये यासाठी चिप्पा मार्केट तयार करण्यात आले आहे. भाजी विक्रेते चौकात भाजी विकण्यासाठी बसू नये यासाठी मनपाकडून अनेकवेळा अतिक्रमणाची कारवाई केली गेली. पण अतिक्रमणाची कारवाई झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ पाहायला मिळते. यामुळे चौकात वाहनांना जाण्यासाठी जागाच मिळत नाही.

शिवाय चौकात रिक्षांची मोठी वर्दळ असते. रिक्षाचालक कधीही ब्रेक मारतात, रस्त्यातच अनेकवेळा थांबतात, यामुळे तेथे वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेले चित्र पाहायला मिळते. शिवाय त्या चौकात जर एखादी मिरवणूक आली तर मग सर्वच बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. शिवाय थोडा जरी पाऊस पडला की पाणी साचते.

सत्तर फूट चौकात नेहमी वर्दळ पाहायला मिळते. पहाटेच्या वेळी शेतकरी भाजीविक्रेते येतात. यामुळे तेव्हापासून जी गर्दी सुरू होते ती गर्दी रात्री बारापर्यंत सुरूच राहते. या चौकात सगळ्या बाजूंनी विविध दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे चौकात गाडी वळवून जाताना प्रत्येकांना वेळ लागतो, अशी तक्रार काही वाहन चालकांनी केली.

शहरातील मुख्य चौकात अनेक बंद पडलेले सिग्नल पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सुरळीत झालेले पहायला मिळते. अशाच प्रकारे सत्तर फूट चौकातील सिग्नल चालू करावे, जेणेकरून त्या परिसरात जाणाऱ्या नागरिकांची सोय होईल. या ठिकाणी नियमितपणे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR