सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालानंतर सर्वत्र प्रवेशाची लगबग सुरू असताना डीएड प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. डीएड प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत पहिल्यांदा १८ जूनपर्यंत होती, मात्र प्रवेश क्षमतेच्या ४० टक्के सुद्धा अर्ज न आल्याने आता २५ जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी लागली आहे. १५ जुलैपासून ‘डीएड’चे प्रथम वर्ष सुरू होणार असून तत्पूर्वी प्रवेशाच्या तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होतील. परंतु, अर्जाची संख्या पाहता पहिल्याच यादीत प्रवेश प्रक्रिया संपेल, अशी सद्यः स्थिती आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी, फार्मसी, बीएसस्सी, बी-कॉम, स्पर्धा परीक्षेसाठी काहीजण बीए अशा अभ्यासक्रमांना आवर्जून प्रवेश घेत आहेत. मात्र, एकेकाळी बारावीनंतर विज्ञान, वाणिज्य, कला अशा तिन्ही शाखांमधील टॉपर विद्याध्यर्थ्यांच्या पसंतीचे डीएड आता ६० ते ६५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील नकोसे वाटू लागले आहे.
त्याचे एकमेव कारण म्हणजे वेळेवर नसलेली शिक्षक भरती आणि दरवर्षीची संचमान्यता, इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल व कमी पटसंख्येमुळे अतिरिक्त होणारे शिक्षक आणि पटसंख्या टिकविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हीच आहेत. आजही टोल नाका, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, शिपाई अशा पदांवर डीएड-बीएड पदवीधारक विद्यार्थी पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर यंदा डीएड प्रवेशासाठी २५ जूनपर्यंत मुदत असली, तरीदेखील प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के सुद्धा अर्ज प्राप्त झालेले नाहीत.जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरती वगळता खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीसाठी . गेल्यावर डीएड- बीएडमध्ये टॉपर असलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा डोनेशन द्यावेच लागते.
शिक्षकाची जागा रिक्त झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते, त्यावेळी तुम्हाला काय येते यापेक्षा डोनेशन किती देवू शकता, हाच पहिला प्रश्न विचारला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आता खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षक भरतीदेखील पवित्र पोर्टलद्वारेच होत असून एका जागेसाठी दहा उमेदवारांना त्याठिकाणी मुलाखतीसाठी पाठविले जाते. त्यावेळी त्याठिकाणी उमेदवारांची निवड कोणत्या निकषांवर होते हे स्पष्ट होत नाही. दोन वर्षे शिकूनही पुन्हा १५ ते २५ लाखांपर्यंत डोनेशन द्यावे लागते अशी भीती तरूणांच्या मनात आजही आहे. त्यामुळेच ‘डीएड-बीएड ‘कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे जाणकार सांगतात.