कल्लाकुरीची : तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने मृतांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. यातील २४ जण करुणापुरम या एकाच गावातील होते. २० जून रोजी सर्व मृतांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण संचालक जे. संगुमणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे दारू प्रकरणातील तीन आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना कुड्डालोर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिन्ही आरोपी ५ जुलैपर्यंत कोठडीत राहणार आहेत.
विषारी दारूमुळे मुलगा गमावलेल्या एका महिलेने मुलाला पोटात प्रचंड दुखत असल्याचे रडत रडत सांगितले. त्याला डोळे नीट उघडताही येत नव्हते. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा त्याला सुरुवातीला अॅडमिटही करण्यात आले नाही. मुलगा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. पुढे मुलाचा जीव गेला. महिलेने पुढे म्हटले की, सरकारने दारूची दुकाने बंद करावी. १०० हून अधिक पीडितांवर कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकजण श्वास घेण्यास त्रास, खराब दृष्टी आणि शरीरात तीव्र वेदनांची तक्रार करत आहे.