लातूर : प्रतिनिधी
वटसावित्री पौर्णिमा दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करण्याची भारतीय संस्कृती आहे. या सणाला पर्यावरणाशी जोडण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने २०१५ साली वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडांचे पूजन करण्यासोबत वडाच्या झाडाची लागवड महिलांनी करावी अशी संकल्पना मांडून हा उपक्रम ९ वर्षांपूर्वी सुरु केला. शुक्रवारी लातूर शहरात अनेक ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडांची लागवड करून अनोख्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वुमन्स विंगने पुढाकार घेतला.
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या ९ वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानने आजवर अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून वृक्षांची चळवळ घराघरात नेण्यासाठी प्रयत्न केला. नाविन्यपूर्ण उपक्रमात झाडांचा वाढदिवस, झाडाचा गणपती, झाडांसोबत रक्षाबंधन, झाडांसोबत मैत्री दिवस, खिळेमुक्त्त झाड अभियान, सेल्फी विथ ट्री, पर्यावरण पूरक सण आणि उत्सव, एक विद्यार्थी : एक वृक्ष उपक्रम, वृक्ष संवर्धन हेल्पलाईन, ट्री बँक, वृक्ष दत्तक योजना, राज्यस्तरीय पर्यावरण परिषद आदी उपक्रमांचा समावेश आहे.
वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करण्यासोबतच वडाच्या झाडाची लागवड महिलांनी करावी अशी संकल्पना २०१५ साली वसुंधरा प्रतिष्ठानने मांडली आणि प्रत्यक्षात २०१५ साली याची अंमलबजावणी सुरु केली. पाहता पाहता हा उपक्रम राज्यभरात राबविला जातो आहे, याचा मनस्वी आनंद आहे अशी प्रतिक्रिया वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी दिली. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी बार्शी रोडवरील स्वामी समर्थनगर, जुना औसा रोड भागातील सद्गुरू नगर, राघवेंद्र कॉलनी आदी भागात उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा प्रतिष्ठान वुमन्स ंिवगच्या अध्यक्षा प्रियाताई मस्के, सदस्य वैष्णवी दबडगावकर, अन्नपूर्णा दबडगावकर, प्रीती पाटील, कविता बादने, मीरा काळे, अंजली बिडवे, सुनीता उपासे, लक्ष्मी हुडे, स्वाती चामे, द्रौपदी शेळके, पूजा शेळके, सुनिता राठोड आदींनी पुढाकार घेतला. महिलांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी घेतलेले हे कौतुकास्पद पाऊल आहे.